Monday 18 September 2017

डबेवाल्यांच्या संघटनेला अभियंत्याचा कोटीचा गंडा; प्रसिद्धीची कामे लाटून पैसे हडपले

डबेवाल्यांच्या संघटनेला अभियंत्याचा कोटीचा गंडा;  प्रसिद्धीची कामे लाटून पैसे हडपले

मुंबई- मुंबई डबेवाल्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत त्यांच्या संघटनेची वेबसाइट सांभाळण्यास नेमलेल्या अभियंत्याने या डबेवाल्यांना सुमारे एक काेटीचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डबेवाला संघटनेस परदेशातून आलेली प्रसिद्धीची कामे या अभियंत्याने बनावट कंपनी स्थापन करून परस्पर वळवली होती. या प्रकरणी दादरच्या शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात अाली अाहे.

मुंबईत तब्बल पाच हजारांवर डबेवाले आहेत. हे डबेवाले दरराेज सुमारे दोन लाख चाकरमान्यांचे डबे त्यांच्या घरून घेऊन त्यांच्या कार्यालयात पोहोचवत असतात. पुण्याच्या बारा मावळातील रहिवासी असलेले बहुसंख्य डबेवाले निरक्षर आहेत. मात्र त्यांची ख्याती जगभर पाेहाेचली अाहे. डबेवाला संघटनेचे स्वत:चे असे संकेतस्थळही आहे. संकेतस्थळ चालवण्यासाठी या संघटनेने सुबोध सांगळे या अभियंत्याची चार वर्षांपूर्वी नियुक्ती केली होती.

सांगळे याने डबेवाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कोणतीही संमती न घेता मयूर कांती यास मदतीस घेतले. या दोघांनी “इंडिया कॉइन’ नावाची एक कंपनी स्थापन केली. ही कंपनी डबेवाल्यांची आहे, असे त्यांनी भासवले. त्यासाठी त्यांनी संघटनेची सर्व सांख्यिकी माहिती त्यासाठी वापरली.

मुंबईच्या डबेवाल्यांची जगभरात मोठी क्रेज आहे. त्यामुळे डबेवाला संघटनेस परदेशातून प्रसिद्धीची कामे येतात. डब्यात जाहिरात टाकण्याची कामेही त्यांना मिळत असतात. त्याचे पैसे आॅनलाइन अदा होतात. मात्र सांगळे व कांती यांनी डबेवाला संघटनेस येणारी शेकडो कामे आपल्या कंपनीच्या नावे घेतली. तसेच त्याची लाखाे रुपयांची देयकेही त्यांच्या कंपनीच्या नावे वळती करून घेतली. हा प्रकार जवळजवळ दोन वर्षे चालू होता. दरम्यानच्या काळात सांगळे अाणि कांती यांच्यात पैशावरून वाद झाला. या वादातून हा प्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यानंतर संघटनेने या दाेघांविराेधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकारात संघटनेचे १ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे डबेवाल्यांच्या संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले.
पाेलिस तपासांवरही शंका 
अभियंता सुबाेध सांगळे यांचा मामा मुंबईत एक नामांकित वकील आहे, तर कांती हा एका हिरे व्यापाऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास हाेईल की नाही, अशी शंका डबेवाला संघटनेने व्यक्त केली आहे. या प्रकरणातील तपास अधिकारी नुकताच बदलण्यात आला आहे. त्यावर डबेवाला संघटनेने आक्षेपही घेतला आहे. गुन्हेगारांना पोलिसांनी पाठीशी घातल्यास मुंबईत एक िदवस डबे पोच करण्याचे काम आम्ही बंद ठेवू, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिला आहे.