Friday, 1 September 2017

ढिगाऱ्याखालून फोन केला, पोलीस म्हणाले...

Image result for bhendi bazar building collapse
सकाळपासून मातीच्या ढिगाऱ्याखाली फसलेल्या अहमद अलींना कसाबसा मोबाइल मिळाला. त्यामुळे त्यांना पुन्हा जगण्याची आशा निर्माण झाली. अहमद अलींनी तात्काळ १०० नंबर डायल केला आणि इमारतीच्या ढिगाऱ्याखाली फसलो असून तात्काळ मदत करा, अशी विनंती पोलिसांना केली. मात्र समोरून आलेल्या उत्तराने अहमद अली चक्रावून गेले. दिवसभरापासून इमारत दुर्घटनेची माहिती वृत्तवाहिन्यांपासून सोशल मीडियापर्यंत येऊन धडकलेल्या असताना पोलिसांनी मात्र अहमद अलीला त्यांचा पत्ता विचारण्याचा प्रताप केला अन् अहमद भाईंच्या काळजात धस्स झालं...

ते म्हणाले, मी दुसऱ्यांदा १०० नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. पण नंतर मला हेल्पलाइनवरून एक फोन आला आणि मी पुन्हा त्यांना पत्ता सांगितला. तेंव्हा पुन्हा फोन डिस्कनेक्ट झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी अहमदभाईंना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढलं. एवढ्या मोठ्या दुर्घटनेतूनही जिवंत राहिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. अहमदभाई हे मुळचे उत्तर प्रदेशातील आहेत. नुकतच त्यांचं लग्न झालं आहे. जवळच्याच एका जनरल स्टोर्समध्ये ते काम करतात आणि रोज रात्री हुसैनी इमारतीच्याखाली झोपायला येतात.