Wednesday 30 May 2018

एसबीआयला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा 7,718 कोटींचा तोटा

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयला जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान ७,७१८ कोटी रुपयांचा तोटा झाला. देशाच्या बँकिंग इतिहासातील हा दुसरा सर्वात मोठा तिमाही तोटा आहे. सर्वाधिक तोटा पंजाब नॅशनल बँकेला १३,४१७ कोटी रुपयांचा झाला होता, जो नीरव मोदी व मेहुल चौकसीच्या घोटाळ्यामुळे होता.
एसबीआयला एवढा तोटा होण्याचे मुख्य कारण अनुत्पादित कर्जात (एनपीएम) वाढीचे आहे. मार्च तिमाहीमध्ये बँकेने एनपीएच्या बदल्यात २४,०८० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मार्च २०१७ मधील १०,९९३ कोटींच्या तरतुदीच्या तुलनेत ही ११९% जास्त आहे. भारतीय बाजारातील कर्जात ४.८ टक्क्यांची वाढ झाली आहे. वाहन कर्जात १५ टक्के आणि गृह कर्जात १३ टक्क्यांची वाढ झाली आहे, तर कंपन्यांच्या कर्जामध्ये केवळ १.८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

बाँडमध्ये गुंतवणुकीतून झालेले नुकसान आणि पगारवाढ यामुळे करावी लागणारी जास्तीची तरतूद यामुळेही तोट्यात वाढ झाली आहे. वार्षिक आधारावर पाहिल्यास एनपीए आणि मार्क-टू-मार्केट (गुंतवणूक) तोट्यामुळे बँकेला २०१७-१८ मध्ये ६,५४७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
एसबीआयला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा 7,718 कोटींचा तोटा