Friday, 1 September 2017

डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी हायकोर्टाची मुंबई महापालिकेला नोटीस


मुंबई- बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टाने महापालिकेला नोटीस बजावली आहे. येत्या दोन आठवड्यात याप्रकरणी म्हणणे मांडण्याचे आदेशही हायकोर्टाने महापालिकेला दिले आहेत.
फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने दाखल केलेल्या या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिका आणि अन्य प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. त्यांना दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. शिवाय अमरापूरकर कुटुंबीयांना वाटत असेल तर ते महापालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकतात. तशी त्यांना मुभा आहे, असेही कोर्टाने स्पष्ट केले.
कारने घरी जात असलेल्या डॉ. दीपक अमरापूरकर यांनी पावसाने पाणी साचल्याने पायी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र मॅनहोलचे झाकण उघडे असल्याने तेथून ते खाली कोसळले. गुरुवारी त्यांचा मृतदेह वरळीच्या समुद्रात आढळून आला. मुंबई महानगरपालिकाच यासाठी जबाबदार आहे, असा आरोप करून या प्रकरणी भादंवि कलम 304 (अ) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला 50 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई महापालिकेला द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.