Tuesday, 29 August 2017

दुरांतोचे इंंजिनसह 9 डबे घसरले, 10 दिवसांत तिसरा मोठा अपघात, कल्याण- कसारा रेल्वे वाहतूक विस्कळीत

पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

मुंबई -नागपूर- मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे इंजिनसह 9 डबे आज (मंगळवारी) सकाळी रुळावरून घसरले. आसनगाव-वाशिंद स्टेशनदरम्यान हा अपघात झाला आहे. यात काही प्रवाशी जखमी सुद्धा झाले आहेत. परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे.

अपघात झाला तेव्हाही पाऊस सुरूच असल्याने मदत कार्यात अडथळे आले आहेत. तरीही सर्वच प्रवाशांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, देशात रेल्वे अपघाताची 10 दिवसांतील ही तिसरी मोठी दुर्घटना आहे. अपघातामुळे कल्याण- मनमाड रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. परीणामी अनेक रेल्वे गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. भुसावळकडे जाणार्‍या गाड्या कल्याण-लोणावळा-पुणे-दौंड-मनमाडमार्गे रवाना करण्यात आल्या आहेत.


मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आसनगाव-वाशिंद स्टेशनजवळ मंगळवारी सकाळी 6 वाजून 40 मिनिटाला हा अपघात घडला आहे. स्थानिक लोकांनी डब्यांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. नंतर रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु केले.
- रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
- या अपघातामुळे विदर्भ, अमरावती सेवाग्राम एक्स्प्रेससह अनेक गाड्या रखडल्या आहेत. लोकल सेवेवरही या अपघाचा परिणाम झाला आहे. प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे.
- अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज रेल्वेने व्यक्त केला आहे.
प्रवाश्यांना राज्य सरकारच्या मदतीने रेल्वे पर्यायी बसेसची व्यवस्था करून देत आहे.
या रेल्वेगाड्या रखडल्या
- विदर्भ एक्स्प्रेस
- अमरावती एक्स्प्रेस
- सेवाग्राम एक्स्प्रेस
- पंचवटी एक्सप्रेस
- कल्याण- कसारा लोकल रेल्वे वाहतूक सुद्धा विस्कळीत
रेल्वे गाड्याचा मार्ग बदलला... कल्याण-लोणावळा-पुणे-दौंड-मनमाडमार्गे
- 17617 सीएसटी मुंबई- हु.सा.नांदेड तपोवन एक्सप्रेस
- 12336 एलटीटी- भागलपूर एक्सप्रेस 
- 12534 सीएसटी मुंबई - लखनऊ पुष्पक एक्सप्रेस
15017 एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस व्हाया अलाहाबाद
11025 भुसावळ-पुणे एक्सप्रेस चा मार्ग बदलून तूर्तास ती 12157 दौंड ते पुणे अशी धावणार आहे.
- 12138 फिरोजपूर - सीएसटी मुंबई पंजाब मेल
- 22102 मनमाड - सीएसटी मुंबई राज्यराणी एक्सप्रेस
- 12110 मनमाड - सीएसटी मुंबई पंचवटी
- 12118 मनमाड - एलटीटी एक्स्प्रेस रद्द करण्‍यात आली आहे.
हेल्पलाईन नंबर CSTM - 022-22694040
हेल्पलाईन नंबर ठाणे - 022-25334840
हेल्पलाईन नंबर कल्याण - 0251– 2311499
हेल्पलाईन नंबर नागपूर - 0712-2564342
सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविले... - रेल्वे
दुर्घटनेनंतर अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविले आहे. प्रवाशांसाठी 20 एसटी बस आणि अनेक टॅक्सीची व्यवस्था करण्यात आल्याची माहीती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.
एलएसजी डब्यांमुळे मोठी जीवितहानी टळली...
- नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे एकूण 9 डबे इंजिनसह घसरले आहेत. सामान्य ट्रेन आणि डबे असते तर मोठी जीवितहानी झाली असती. मात्र, एलएसजी तंत्रज्ञानाचे डबे असल्याने मोठ्या जीवितहानीचा धोका टळला.
- एलएसजी तंत्रज्ञान हे जर्मनीहून आले आहे. या विशेष तंत्रज्ञानाने बनवल्या जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यांचे वजन सामान्य डब्यांच्या तुलनेत निम्मे असते. त्यामुळे, डिरेलमेंटनंतर होणाऱ्या नुकसानाचा धोका कमी असतो.
- सामान्य रेल्वेचे डबे लोखंडी असल्याने त्यांचे वजन 80 टनाच्या जवळपास असते. मात्र, एलएसजी टेक्नॉलोजीवर आधारित डबे अॅल्युमिनियमने बनवले जात असल्याने त्यांचे वजन 40 ते 45 टन एवढे असते.
- काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींची संख्या समजू शकली नाही. जे प्रवाशी वरच्या बाकावर झोपले होते. ट्रेनच्या झटक्यांमुळे ते खाली पडले. त्यात ते जखमी झाले.
डब्यांसह रेल्वेचे इंजिन सुद्धा रुळावरून घसरले आहे.