Friday, 1 September 2017

लग्नात वाढला सोन्याचा भात


पूर्वी राजे, सरदार, नवाब लोक सोन्या-चांदीच्या ताटात जेवत असत. आपल्या ऐश्‍वर्याच्या प्रदर्शनाचा हा एक प्रयत्न असला तरी त्याला शास्त्रीय कारणही होते. सोन्या-चांंदीच्या ताटात जेवल्याने या धातूचा अल्पसा अंश पोटामध्ये जात राहतो, जो शरीरासाठी उपयुक्त असतो असे मानले जाते. सध्या काही मिठाईवर चांदीचा वर्क लावला जातो, तर काही च्यवनप्राशमध्येही हा धातू असल्याचा दावा केला जातो.
हाच धागा लक्षात घेऊन हैदराबादमधील एका रईसजाद्याने आपल्या कुटुंबातील एका लग्नावेळी वर्‍हाडी मंडळींना सोनेरी वर्क असलेला भात वाढला होता. या लग्नातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. यात केळीच्या पानावर वाढलेला सोनेरी भात दिसत आहे. तेलंगणामधील प्रसिद्ध कॅटरर व्ही. साई राधाकृष्णा यांची ही कल्पना होती. ते म्हणतात की शिजवताना सोन्याचा अर्क वापरल्यामुळे भात सोनेरी दिसत आहे. अशा प्रकारच्या भातामुळे शरीराला कोणताही अपाय होत नाही तर फायदाच होईल, असा त्यांचा दावा आहे. हा भात सहजपणे पचतो असे ते म्हणतात. कृष्णा यांची ही नवीन कल्पना आता आणखी कोणकोण अमलात आणतात ते पाहावे लागेल.