Friday, 1 September 2017
इडली सांबारात सापडली अळी, कोकण रेल्वेने दिलं ठोकळेबाज उत्तर
कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका तरूणाला इडली सांबारात अळी सापडली आहे. अभिजीत सावंत असे या प्रवाशाचे नाव असून ते डोंबिवलीचे रहिवासी आहेत. काही घास खाल्ल्यानंतर अभिजीत यांना इडलीत काहीतरी असल्याचं जाणवलं. नीट बघितल्यानंतर ती अळी असल्याचं त्यांच्या लक्षात आले.
काही दिवसांपूर्वी कॅगनेही रेल्वेत मिळणाऱ्या अन्नाच्या दर्जावर जबरदस्त ताशेरे ओढले होते.
अभिजीत गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर घरी परतत होता. तो कु़डाळ-पनवेल या गणेशोत्सवासाठी सोडलेल्या विशेष गाडीने परतत होता. ट्रेनमध्ये बसल्यानंतर त्याने इडली सांबार मागवलं. निवसर स्टेशनजवळ आल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की इडली-सांबारमध्ये अळी आहे. हे बघून अभिजीतला मळमळल्यासारखं झालं. त्याच्यासारखीच अवस्था त्याच्या शेजारी असलेल्या प्रवाशांचीही झाली होती. हा प्रकार अभिजीत याने त्याचा भाऊ नितेश याला मोबाईलवरून कळवला. नितेशने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना याबाबतचं ट्विट केलं. त्यानंतर कोकण रेल्वेने या ट्विटची दखल घेत याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचं उत्तर दिलं आहे. मात्र त्यापुढे रेल्वे प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये.