Wednesday, 13 September 2017

११ दिवसांत डेंग्यूचे १०२ रुग्ण

साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास; मलेरिया, लेप्टो, स्वाइन फ्लूच्या रुग्णांतही वाढ
सुमारे १५ दिवसांपूर्वी अवघ्या मुंबईला झोडपून काढणाऱ्या पावसाने गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतली असताना, आता साथीच्या आजारांनी मुंबईकरांना छळायला सुरुवात केली आहे. पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने या पाण्यावर डासांचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. सप्टेंबर महिन्याच्या ११ दिवसांतच मुंबईत डेंग्यूच्या १०२ रुग्णांची नोंद झाली आहे. तर मलेरियासह अन्य आजारांनी ग्रासलेल्या ५००हून अधिक रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे.
२९ ऑगस्ट रोजी मुंबईत हाहाकार उडवल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. परंतु, पावसामुळे खड्डय़ांत साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने त्यावर डेंग्यूच्या अळय़ांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यंदा जानेवारी ते ऑगस्टपर्यंत मुंबईत डेंग्यूचे २९३ रुग्ण आढळून आले असून केवळ सप्टेंबरच्या पहिल्या ११ दिवसात १०२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षभरातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. ऑगस्ट महिन्यात डेंग्यूमुळे दोन जणांचा मृत्यूही झाला आहे. याव्यतिरिक्त मलेरिया आजाराच्या रुग्णांमध्येही वाढ होत असून ऑगस्ट महिन्यात १०४८ मलेरियाचे रुग्ण आढळून आले होते व एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या ११ दिवसात मलेरियाचे २७१ रुग्ण आढळून आले आहेत.