Friday, 1 September 2017
विराट-रोहितचे शतक; भारताचा 168 धावांनी विजय, श्रीलंकेचा विश्वचषकातील प्रवेश धोक्यात
कोलंबो- कर्णधार विराट कोहली (१३१) आणि सलामीवीर रोहित शर्मा (१०४) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेला चौथ्या वनडेत १६८ धावांनी पराभूत केले. भारताने ५० षटकांत ५ बाद ३७५ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा डाव ४२.४ षटकांत २०७ धावांवर संपुष्टात आला. त्यांना या मालिकेत दोन विजय आवश्यक होते, मात्र आता या पराभवामुळे श्रीलंकेसमोर विश्वचषकात थेट प्रवेशासाठीच्या अडचणी वाढल्या आहेत.
श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने एकाकी झूंज देत ७० धावा केल्या. त्याने ३४ वे अर्धशतक झळकावले. त्याने श्रीवर्धने (३९) सोबत पाचव्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी केली. डी सिल्वाने २२, तर थिरमानेने १९ धावा केल्या. इतरांनी निराशा केली. भारताच्या जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
तत्पूर्वी, भारताचा सलामीवीर शिखर धवन (४) बाद झाल्याने पहिला धक्का बसला. दुसरा सलामीवीर रोहित शर्माने ८८ चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकार खेचत १०४ धावांची खेळी केली. त्याचे हे सलग दुसरे आणि एकूण १३ वे शतक ठरले. अँजेलो मॅथ्यूजने त्याला डिकवेलाच्या हाती झेलबाद केले. कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढले. त्याने अवघ्या ९६ चेंडूंत १३१ धावा कुटल्या. या शतकी खेळी त्याने १७ चौकार आणि २ षटकार ठोकले. त्याने २९ शतकांसह श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याला (२८) मागे सोडले. तसेच श्रीलंकेविरूद्ध आपल्या २ हजार धावा पुर्ण केल्या. कोहलीने २६ व्या षटकांच्या पाचव्या चेंडूवर एक धाव घेत संघाच्या २०० धावा पूर्ण केल्या. हार्दिक पंड्याने १९ आणि के.एल. राहुलने अवघ्या ७ धावा काढल्या. श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने २ विकेट घेतल्या. एका बळीसह मलिंगाने करिअरमधील ३०० बळींचा टप्पा पूर्ण केला.
विराट-राेहितची द्विशतकी भागीदारी
सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माने मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी करत दुसऱ्या विकेटसाठी २१९ धावांची भागीदारी रचली. दुसरीकडे मनीष पांडे आणि महेंद्रसिंग धोनीने नाबाद १०१ धावांची शानदार शतकी भागीदारी केली. यात मनीषने ४२ चेंडूंत ४ चौकार खेचत नाबाद ५० धावा केल्या.
महेंद्रसिंग धोनीचा ‘नाबाद’ विश्वविक्रम
जगातील सर्वोत्तम फिनिशर म्हणून ओळखला जाणारा आणि आपला विक्रमी ३०० वा वनडे सामना खेळणाऱ्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या सामन्यात नाबाद राहण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. त्याने ४२ चेंडूंत ५ चौकार व १ षटकार खेचत नाबाद ४९ धावा काढल्या. धोनी आतापर्यंत एकूण ७३ वेळा नाबाद राहिला. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या शॉन पोलॉक (७२) आणि श्रीलंकेच्या चामिंडा वासला (७२) मागे सोडले.
शार्दूलचा पदार्पणात बळी
मुंबईचा युवा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने आंतरराष्ट्रीय क्रिकेेटमध्ये पदार्पण केले. त्याला चौथ्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने अखेर संघात स्थान देत त्याचे स्वप्न पूर्ण केले. त्याने लंकेचा सलामीवीर निरोशन डिकवेलाला बाद करत पदार्पणात बळी घेतला. त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.