Tuesday, 29 August 2017

रेल्वेतून पडलेल्या मामाच्या शाेधार्थ निघालेल्या भाच्यावर नियतीचा घाला, रेल्वेखाली येऊन मृत्यू

रेल्वेतून पडलेल्या मामाच्या शाेधार्थ निघालेल्या भाच्यावर नियतीचा घाला, रेल्वेखाली येऊन मृत्यू
सोलापूर- कामाच्या निमित्ताने नेपाळमधील मामा-भाचे कर्नाटक एक्स्प्रेसने दिल्लीहून बंगळुरूला निघाले हाेते. जनरल डब्यातून त्यांचा प्रवास सुरू हाेता. मात्र, बाळे (जि. साेलापूर) स्थानकापासून थाेडे पुढे गेल्यानंतर मामा अचानक ताेल जाऊन रेल्वेतून पडला. त्यामुळे भाचा गर्भगळीतच झाला. साेलापूर स्थानकावर त्याने अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने रेल्वे पाेलिसांना मामाच्या शाेधासाठी पाठवले. मात्र, अंधार असल्यामुळे शाेध लागला नाही. त्यामुळे भाच्याची घालमेल सुरू हाेती. थाेडेसे उजाडताच त्याने स्वत: रेल्वे लाइनवर फिरून मामाचा शाेध घ्यायला सुरुवात केली. मात्र, नियतीने त्याच्यावरही झडप घातली. साेलापूर- बाळे रेल्वे लाइनवर फिरत असलेल्या या भाच्यालाही एका रेल्वेगाडीने चिरडले. रविवारी सकाळी मामा जखमी अवस्थेत सापडले, भाच्याचा मात्र मृतदेह हाती लागला.

मामा पूनम प्रसाद गौतम (३६) व भाचा भवानी प्रसाद (२४, रा. दोघेही पुसापानी, जि. दहिलेक, नेपाळ) अशी मृतांची नावे अाहेत. शुक्रवारी हे दाेघेही नवी दिल्लीहून बंगळुरूकडे रेल्वेने निघाले हाेते. शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गाडी बाळे स्थानकावरून पास झाली. याचदरम्यान दरवाजाजवळ उभे असलेले पूनम प्रसाद हे धावत्या गाडीतून पडले. भवानी प्रसादच्या डाेळ्यादेखत हा प्रकार घडला, मात्र ताे मामाला वाचवू शकला नाही. काही मिनिटांतच सोलापूर स्थानक आले. भाच्याने स्थानक उपव्यवस्थापकांना अपघाताची माहिती दिली. त्यांनी आरपीएफ कॉन्सटेबल एच. सी. राठोड यांना तातडीने बाळे स्थानकाच्या दिशेने पाठवले. मात्र, अंधार असल्यामुळे त्यांना मामाचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे राठोड यांनी त्यांचा सकाळी शोध घेण्याचे ठरवले. ताेपर्यंत त्यांनी भाच्याला स्थानकावरील वेटिंग रूममध्ये थांबवले. मात्र, भवानी प्रसाद मामाच्या शाेधासाठी अधीर झाला हाेता. पहाट हाेताच ताे स्वत:च रेल्वे ट्रॅकवर मामाचा शाेध घेत फिरू लागला. याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या रेल्वेने त्याला चिरडले.

भवानी प्रसादच्या मृत्यूनंतर काही वेळातच रेल्वे पाेलिसांना सोलापूर स्थानकापासून काही अंतरावर शेटेवस्तीजवळ एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. ते भवानी प्रसादचे मामाच हाेते. त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर जखम झाली होती. साेलापूर शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू अाहेत. मामा सापडल्यानंतर पाेलिसांनी रेल्वे स्थानकावर उद्घाेषणा करून भाच्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताे अाढळून अाला नाही. सकाळी साडेअाठच्या सुमारास रेल्वे पाेलिसांना एका तरुणाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर पडल्याचा काॅल अाला. पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता ताे भाचा भवानी प्रसादचा मृतदेह निघाला.